मुंबई भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आणि मंत्री आशिष शेलार यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांबद्दल वादग्रस्त विधान केलं आहे. राज ठाकरेंच्या पक्षांची तुलना आशिष शेलार यांनी थेट पहलगाममधील दहशतवाद्यांशी केली आहे. मुंबईमध्ये पत्रकारांशी बोलताना आशिष शेलार यांनी ही टीका केली आहे.
दहशतवाद्यांनी धर्म विचारुन मारलं तसं यांनी भाषा विचारुन मारलं असं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे. “पहलगाममध्ये त्या लोकांनी धर्म विचारुन हिंदूंना गोळ्या मारल्या. इथे ही सगळी मंडळी निष्पाप हिंदूंना भाषा विचारुन चोपतायत. दोन्ही गोष्टी उद्विग्न करणाऱ्या आहेत. व्हिडीओ काढा अथवा नका काढू पण हिंदूंना चोपण्यामध्ये तुम्हाला जो आनंद मिळतोय ना हा अख्खा महाराष्ट्र पाहतोय,” असं शेलार म्हणाले.