डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने ‘दहशतवाद्यांना सहानुभूती देणारी’ असल्याच्या आरोपावरून विद्यार्थी व्हिसा रद्द केल्यानंतर भारतीय विद्यार्थिनी रंजनी श्रीनिवासन अमेरिकेतून कॅनडाला रवाना झाली आहे. न्यू यॉर्क टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत, ३७ वर्षीय रंजनी श्रीनिवासनने सांगितले की, वातावरण धोकादायक असल्याचे वाटल्याने तिने न्यू यॉर्क सोडून कॅनडाला जाण्याचा निर्णय घाईघाईने घेतला.
“अमेरिकेतील वातावरण खूप अस्थिर आणि धोकादायक वाटत होते. म्हणून मी लगेच निर्णय घेतला,” असे रंजनी मुलाखतीत म्हणाली. रंजनी श्रीनिवासन कोलंबिया विद्यापीठात पीएचडी स्कॉलर होती आणि शहरी नियोजनात डॉक्टरेट करत होती. याआधी तिने फुलब्राइट शिष्यवृत्तीद्वारे हार्वर्डमधून पदव्युत्तर पदवी मिळवली आहे.
रंजनी श्रीनिवासनचा व्हिसा अमेरिकन प्रशासनाने रद्द केलेल्यानंतर, तिने सीबीपी होम (Customs and Border Protection) अॅपद्वारे स्वतः देश सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ती कॅनडाला रवाना झाली. रंजनीवर हमासला पाठिंबा देण्याचा आरोप होता. सुरक्षेच्या कारणास्तव तिचा व्हिसा रद्द करण्यात आल्याचे सरकारचे म्हणणे आहे.