पाकिस्तानमध्ये जाफर एक्सप्रेस या प्रवासी एक्सप्रेसवर दहशतवादी हल्ला झाला आहे. या गोळीबारात रेल्वे चालक जखमी झाला असून रेल्वेमध्ये असलेल्या ४०० प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ही नऊ डब्यांची रेल्वे बलुचिस्तान प्रांतातील क्वेटा येथून खैबर पख्तुनख्वा येथील पेशावर येथे जात होती. बलूच लिबरेशन आर्मी या फुटीरतावादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली असून, त्यांनी सुरक्षा कर्मचाऱ्यांसह रेल्वेतील प्रवाशांना ओलीस ठेवले असल्याचे म्हटले आहे. मात्र, हल्लेखोरांनी प्रवाशांना ओलीस ठेवल्याच्या दाव्याची अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नाही.
स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तांनुसार, बलूच लिबरेशन आर्मीने दावा केला आहे की, या हल्ल्यात सहा लष्करी कर्मचारी मारले गेले आहेत. बलूच लिबरेशन आर्मीने असेही म्हटले आहे की, त्यांनी १०० हून अधिक प्रवाशांना ताब्यात घेतले आहे. तसेच, पाकिस्तानने ओलीस ठेवण्यात आलेल्या प्रवाशांच्या सुटकेचा प्रयत्न केल्यास सर्वांची हत्या करण्याची धमकीही दिली आहे.
या हल्ल्यानंतर बलुचिस्तान सरकारने आपत्कालीन उपाययोजना लागू केल्या असून, परिस्थिती हाताळण्यासाठी विविध सुरक्षा संस्थांना तैनात केल्याची माहिती सरकारचे प्रवक्ते शाहिद रिंद यांनी दिली आहे.