भारताचा शेजारी देश असलेल्या बांगलादेशात पुन्हा एकदा हिंसाचार पेटला आहे. माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या ऑनलाईन भाषणानंतर, ढाक्यातील दंगलखोरांनी शेख मुजीबुर रहमान यांच्या निवासस्थानाची तोडफोड केली. हजारोंच्या संख्येने निदर्शक प्रथम शेख मुजीबुरहमान यांच्या घराजवळ पोहोचले आणि त्यांनी घराची तोडफोड केली. यानंतर बांगलादेशातील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे ढासळल्याचे समोर आले आहे. ज्या वेळी निदर्शकांनी शेख मुजीबुरहमान यांच्या घराला आग लावली, त्या वेळी त्यांची मुलगी आणि देशाच्या माजी पंतप्रधान शेख हसीना या त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना ऑनलाइन संबोधित करत होत्या.

बांगलादेशमध्ये आंदोलकांनी ढाकाच्या धानमंडी भागातील शेख मुजीबुर रहमान यांच्या घरावर हल्ला केला. हल्ला करणारे बुलडोझर घेऊन आले होते. त्यांनी शेख मुजीबुरहमान यांचे घर पेटवून दिले. दरम्यानच्या काळात हजारोंच्या संख्येने अवामी लीगचे समर्थक, कार्यकर्ते आणि नेत्यांना अटक झाली आहे. या हिंसाचाराविरोधात अवामी लीगने ६ फेब्रुवारीला मोठ्या प्रदर्शनाची तयारी केली होती. शेख हसीना यांच्या अवामी लीगने कार्यकर्ते आणि नेत्यांना रस्त्यावर उतरण्याचे आवाहन केले होते. मात्र त्या आधीच परिस्थिती गंभीर झाली.

घटनेनंतर शेख हसीना भावूक
या हिंसक घटनेवर शेख हसीना यांनी भावूक होऊन प्रतिक्रिया दिली आहे. त्या भावूक होत म्हणाल्या, “हा इतका विध्वंस का ?, मी लोकांना विचारते, मी असे काय केले की तुम्हाला इतका राग येतोय? तुम्हाला एका घराची इतकी भीती का वाटते? जर तुम्ही तुमचा इतिहास विसरलात, तर तुम्ही कधीही पुढे जाऊ शकत नाही”. देशाच्या संविधानावर आणि ध्वजावर हल्ला करणाऱ्यांना कदाचित पाकिस्तानपासून मिळालेले स्वातंत्र्य आवडत नसेल. त्यांनी पाकिस्तानच्या वसाहतीत राहणे पसंत केले असते,” असे हसीना म्हणाल्या.
पुढे त्या म्हणाले, “बंगबंधूंच्या संघर्षामुळे हा देश पाकिस्तानपासून मुक्त झाला. जर आपण आजही पाकिस्तानात असतो तर आपल्याला भाषेचा किंवा नोकऱ्यांचा अधिकार नसता. आपण सर्वजण बेरोजगार असतो. आजपर्यंत पाकिस्तानात एकही बंगाली जनरल नाही. तुम्ही कधी ऐकले आहे का?”, असेही शेख हसीना त्यांच्या भाषणात म्हणाल्या.