नाशिक जिल्ह्यात असणाऱ्या अंजनेरी पर्वतावर हनुमान जयंतीनिमित्त दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांवर मधमाशांनी हल्ला केला. हल्ल्यानंतर मंदिराबाहेरच्या परिसरात एकच गोंधळ उडाला.
हनुमान जयंतीच्या निमित्तानं दरवर्षी मोठया संख्येनं भाविक अंजनेरी पर्वतावर येतात. यंदाच्या वर्षीसुद्धा या खास दिवसानिमित्त मंदिराबाहेरील परिसरामध्ये भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. त्यातच मधमाशांच्या या हल्ल्यामुळं काही काळ या परिसरात भीतीचं वातावरण पाहायला मिळालं होतं. इथं मधमाशा सैरावैरा उडू लागताच भाविकांनी लपून बसण्यासाठी आसरा शोधत काहींनी पळ काढला, तर काहींनी मिळेल त्या वस्तूनं चेहरा झाकण्याची धडपड केली. जे भाविक या हल्ल्यात जखमी झाले त्यांना तातडीनं नजीकच्या रुग्णालयात उपचारांसाठी नेण्यात आलं आहे.
दरम्यान मधमाशांच्या हल्ल्यानं उत्सवाला गालबोट लागलं असलं तरीही आता मात्र येथील परिस्थिती नियंत्रणात असल्याचं सांगण्यात येत आहे.