सध्या राज्यात बीड आणि मुंडे परिवाराची चर्चा आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. त्यामुळे पुन्हा एकदा बीड जिल्ह्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत. यावर आता पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी भाष्य केलं असून प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाल्या पंकजा मुंडे?
जालना येथे शिवसेनेच्यावतीने पर्यावरण मंत्री तथा पालकमंत्री पंकजा मुंडे यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात बोलताना त्यांनी राजकीय परिस्थितीवर खंत व्यक्त केली. राजकारण म्हणजे गढूळ पाण्यात कपडे धुण्यासारखे आहे. आपण किती दिवस त्यात तुरटी फिरवायची, काही लोक ठरवून सुपारी घेऊन आरोप करतात. कशातही आपलं नाव ओढतात, असं म्हणत टीका टिप्पणीवर खंत व्यक्त केली. त्यांच्या या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा आहे.
तुमच्या नजरेत मला गोपीनाथ मुंडे दिसतात, ती नजर खाली जाऊ नये म्हणून राजकारणात आले आहे,” असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.

सरपंच हत्येप्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. पंकजा मुंडे म्हणाल्या की, अजित पवारांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. यात संबंध आढळला तर आम्ही योग्य ती कारवाई करू. संबंध नसेल तर अन्याय व्हायला नको, हा अजित दादांचा निर्णय आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री याबाबत निर्णय घेतील. मला त्याबद्दल फार काही माहीत नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.