बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील सेनगाव येथे ज्ञानेश्वरी अंजान या महिलेला सरपंच व इतर दहा जणांनी १४ एप्रिल रोजी लाकडी काठी व रबरी पाईपने मारहाण केली. या प्रकरणात वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी फरार आहेत. या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करावी अशी मागणी पुढे येत असून वडगाव पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
पीडित महिलेने सांगितलं आहे की, “मंदिरावरील भोंगे आणि गिरण्यांची मी ज्या आधी तक्रारी दिल्या होत्या, त्यासाठी मला मारहाण करण्यात आली. मला पोलिसांनी सहकार्य केलं. आज मी पोलिसांमुळेच जिवंत आहेत. पोलिसांनी मला खूप सहकार्य केलं. 10 जण मिळून आले होते, त्यातील 9 जणांनी मला बेदम मारहाण केली. एकजण हिला खल्लास करुन टाका, जिवंत सोडू नका असं म्हणत घाणेरड्या शिव्या देत होता. मी बेशुद्ध होईपर्यंत मला मारलं आहे”.
“या सर्वांवर मकोका लावावा अशी माझी मागणी आहे. त्यांना जामीन देण्यात येऊ नये. त्यांनी माझा खून करण्याचा प्रयत्न केला,” असंही त्यांनी म्हटलं आहे. “सरपंच हे पद साधं नसतं. सगळ्यांना घेऊन चालणं अपेक्षित असतं. हा त्या लायकीचा नसल्याने त्याचं सरपंचपद रद्द करावं. मी त्याच्या मुलीच्या वयाची आहे. माझ्या घरचं कोणी नसताना, कोणी मदत करु शकणार नाही याची खबरदारी घेऊन त्याने हल्ला केला. माझे हात, डोकं, पाठ सगळीकडे मारहाण केली आहे. त्यामुळे आधी सरपंचपद रद्द करावं. यांना अजिबात जामीन देऊ नये. एकतर संरक्षण द्या किंवा आमचं स्थलांतर करा,” अशी मागणीही त्यांनी केली आहे.