इंडियाज गॉट टॅलेंट हा शो सध्या वादात सापडला आहे. युट्यूबर रणवीर अलाहाबादियाने अश्लील प्रश्न विचारल्यानंतर सगळ्या स्तरातून टीका होत आहे. रणवीर अलाहाबादिया, समय रैनासह शोशी संबंधित इतर काही लोकांविरोधात तक्रार करण्यात आली आहे. मुंबई पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. उर्फी जावेद, राखी सावंत, भारती सिंह, दीपक कलाल, रॅपर रफ्तार, हर्ष लिम्बाचिया यांच्यासह या शोमध्ये परिक्षक म्हणून सहभगी झालेल्या अनेक सेलिब्रिटींना समन्स पाठवण्यात आलं आहे. रणवीर अलाहाबादियाचं हे प्रकरण संसदेपर्यंतही पोहोचलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही संताप व्यक्त केला.

या घटनेचा मराठी युट्यूब चॅनेल भाडिपाने धसका घेतला आहे. रणवीर अलाहाबादियाच्या प्रकरणावरुन धडा घेत भाडिपाने एक मोठा निर्णय घेतला आहे. भारतीय डिजिटल पार्टी’ अर्थात ‘भाडिपा’ नावाच्या युट्यूब चॅनेलवर ‘अतिशय निर्लज्ज कांदेपोहे’ नावाचा एक कार्यक्रम सुरु करण्यात आला होता. ‘इंडियाज गॉट लॅटेंट’सारखाच या शोचा फॉरमॅट आहे. या शोचा पहिला भाग अभिनेत्री भाग्यश्री लिमयेच्या उपस्थितीत पार पडला. स्पर्धकांना भाग्यश्रीला इम्प्रेस करण्यासाठी बोलावण्यात आलं होतं. जज म्हणून सारंग साठ्ये, नचिकेत पुर्णपात्रे, गणेश जोशी, साहिल, अनिष गोरेगावकर हे सहभागी झाले होते. आता ‘अतिशय निर्लज्ज कांदेपोहे’च्या 14 फेब्रुवारी रोजी प्रसारित होणाऱ्या एपिसोडमध्ये अभिनेत्री सई ताम्हणकर सहभागी होणार होती. मात्र इंडियाज गॉट लॅटेंटच्या सगळ्या प्रकरणामुळे भाडिपाने हा शो पुढे ढकलला आहे. या शोसाठी तिकिटे बुक करणाऱ्यांचे पैसे परत दिले जाणार असल्याचं जाहिर करण्यात आलं आहे.

भाडिपाने एका पोस्टमध्ये लिहिलं होतं की, “भाडिपाच्या Fans ना कळवण्यात वाईट वाटत आहे की, सध्या ‘वातावरण तापल्यामुळे’ 14 फेब्रुवारीला होणारा अतिश निर्लज्ज कांदेपोहेचा Show आम्ही Postpone करत आहोत. तसंही Valentines Dayला प्रेमापेक्षा जास्त द्वेषच मिळतो. पण आमचं आमच्या Fans वर प्रेमच आहे. आमच्या Talent ला आणि प्रेक्षकांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून आम्ही हा निर्णय घेतला आहे.”
पोस्टमध्ये सगळ्यात शेवटी लिहिलंय की, अतिशय निर्लज्जपणे आमचा हा सभ्य Show लवकरंच घेऊन येऊ. आमच्याकडून आम्ही पूर्ण प्रयत्न केला.. पण तुमचा यंदाचाही Valentines Day घरीच बसून जाणार! भाडिपाने त्यांच्या अकाउंटवरुन ही पोस्टदेखील डिलिट केली आहे.