देशाचे नेतृत्व फक्त यशाचे श्रेय घेऊन केले जात नाही, अपयशाची जबाबदारीही घेतली पाहिजे अशा शब्दांत काँग्रेसच्या खासदार प्रियंका गांधींनी केंद्र सरकारला खडे बोल सुनावले आहेत. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर गृहमंत्री, गुप्तचर प्रमुख यांनी राजीनामा दिला का? अशी विचारणा करत त्यांनी मुंबई 26/11 हल्ल्यानंतर देण्यात आलेल्या राजीनाम्यांचा उल्लेख केला. तसंच सर्व खासदारांकडे सुरक्षा असताना, पहलगाममध्ये सर्वसामान्यांसाठी सुरक्षा नव्हती असं सांगत सरकारवर निशाणा साधला.
“या सभागृहातील प्रत्येकाकडे सुरक्षा आहे. आपण जेथे जातो तिथे सोबत सुरक्षारक्षक सोबत येतात. त्या दिवशी पहलगाममध्ये 26 कुटुंब उद्ध्वस्त झाली. 26 लोकांना आपल्या कुटुंबातील सदस्यांसमोर मारण्यात आलं. 26 मुलं, पती, वडील गेले. त्यामधील 25 भारतीय होते. जितके लोक पहलगाममध्ये होते, ज्यांना मारण्यात आलं त्यांच्यासाठी कोणतीही सुरक्षा नव्हती. तुम्ही कितीही ऑपरेशन केलीत तरी, हे सत्य लपवू शकत नाही, नाकारु शकत नाही. तुम्ही त्यांना सुरक्षित ठेवलं नाही,” अशी टीका प्रियंका गांधींनी केली.