कराड तालुक्यातील एका महिलेला नग्न फोटो पाठवल्याच्या आरोपांमुळे अडचणीत सापडलेले राज्याचे ग्रामविकासमंत्री व भाजप नेते जयकुमार गोरे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. या प्रकरणातील पीडित महिलेने काही धक्कादायक दावे केले आहेत.
संबंधित महिलेने जयकुमार गोरे यांच्याविरोधात १७ मार्च २०२५ पासून राजभवन मुंबई येथे उपोषणाला बसणार असल्याचा ठाम निर्णय घेतला आहे. मला गेल्या सहा वर्षांमध्ये अनेकदा मंत्र्यांच्या कार्यकर्त्यांनी त्रास दिला होता. ज्यावेळी मला पत्र आलं त्यावेळी मी त्रास होत असल्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर थांबून याबाबतची माहिती सांगितली. त्याचप्रमाणे जिल्हा पोलीस अधीक्षकांना घटनेबाबत सांगितली. मात्र, त्यावेळी पोलीस अधीक्षकांनी कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळे मी १७ मार्च रोजी माझी बदनामी होत असल्याने उपोषण करणार असल्याचा ठाम निर्णय पीडित महिलेने घेतला आहे.
अजून एक धक्कादायक दावा या महिलेने केला आहे. गेल्या दोन दिवसांपासून आणखी एक महिला माझ्या संपर्कात आहे. मी तिचं नाव सांगून तिची ओळख उघड करणार नाही. मात्र, माझं जयकुमार गोरे याच्याबाबत जे मत आहे, तेच तिचंही मत आहे.
दरम्यान, मंत्री जयकुमार गोरे यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. हे आपल्या विरोधात राजकीय कटकारस्थान होत असल्याचे सांगत आहेत. पण पीडितेच्या या दाव्यांनी जयकुमार गोरे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.