भाजप आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिषा भिसे यांच्या मृत्यूनंतर नवा वाद निर्माण झाला आहे. तनिषा भिसे या गर्भवती होत्या. त्यांना त्रास होत असल्याने नातेवाईकांनी त्यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात नेलं. पण तिथे रुग्णालय प्रशासनाने पैशांसाठी मुजोरपणा केल्याचा आरोप आमदार अमित गोरखे यांनी केला आहे. रुग्णालयाने 10 लाख रुपये डिपॉझिट मागितली. यावेळी महिलेच्या नातेवाईकांनी अडीच लाख रुपये जमा करतो आणि उरलेली रक्कम नंतर भरतो असं सांगितलं. पण रुग्णालय प्रशासनाने महिलेला दाखल करुन घेतलं नाही. मंत्रालयातून रुग्णालय प्रशासनाला फोन करण्यात आला पण त्यांनी सहकार्य केलं नाही.
त्यानंतर त्यांना दुसऱ्या रुग्णालयात दाखल केलं. पण या सगळ्यात तीन तासांचा वेळ गेला त्यात तनिषा यांची प्रकृती अधिकच खालावली. त्यांनी जुळ्या मुलींना जन्म दिला पण त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. आमदार अमित गोरखे यांनीही रुग्णालयावर आरोप केला आहे. या घटनेवरुन दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनावर चौफेर टीका होत आहे. या घटनेनंतर आता रुग्णालय प्रशासनाकडून अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आली आहे.
दीनानाथ रुग्णालयाची प्रतिक्रिया
दीनानाथ रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी रवी पालेकर यांनी आरोपांवर प्रतिक्रिया दिली आहे. “या घटनेसंदर्भात दीनानाथ रुग्णालयाकडून चौकशी केली जाणार आहे. या संदर्भातला अहवाल आम्ही राज्य सरकारला सादर करणार आहोत. मीडियात सध्या बातम्या येत आहेत. त्या अर्धवट आहेत. त्यांनी केलेल्या आरोपांची चौकशी केली जाणार आहे. सध्या मला जास्त बोलता येणार नाही”, अशी प्रतिक्रिया दीनानाथ रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी रवी पालेकर यांनी दिली आहे.
यासंदर्भात आमदार अमित गोरखे म्हणाले, पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल हे गरिबांसाठी ट्रस्ट म्हणून चालवलं जातं. पण, पैशाअभावी प्रसूतीसाठी आलेल्या एका महिलेला ॲडमिट करून घेण्यास नकार देण्याचा गंभीर गुन्हा हॉस्पिटलने केलेला आहे. हॉस्पिटलच्या अशा अनेक तक्रारी आमच्याकडे आलेल्या आहेत. हा विषय मी येत्या अधिवेशनात मांडणार आहे. त्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कडक पाऊले उचलावीत, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार आहे.