भाजप महाराष्ट्राला पुढचे मणिपूर करू इच्छिते: आदित्य ठाकरे

नागपूर मधील हिंसाचाराच्या घटनेनंतर राज्य सरकारसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर विरोधकांनी जोरदार टीका सुरू केली आहे. शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) आमदार आदित्य ठाकरे यांनी, भाजप महाराष्ट्राला पुढचे मणिपूर करू इच्छित असल्याचे म्हटले आहे.

नागपूर हिंसाचार प्रकरणावर माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, “नागपूरमध्ये हिंसाचाराच्या अफवा पसरत असताना मुख्यमंत्री कार्यालयाने प्रतिक्रिया का दिली नाही? जेव्हा जेव्हा अशी घटना घडणार असते तेव्हा पहिला अहवाल राज्याच्या मुख्यमंत्री आणि गृह विभागाकडे येतो. त्यांच्याकडे याबद्दल कोणतीही माहिती नव्हती का? मला वाटते की भाजपा महाराष्ट्राला पुढचे मणिपूर बनवू इच्छित आहे.”

आदित्य ठाकरे पुढे म्हणाले, “जर तुम्ही मणिपूरकडे पाहिले तर, तिथे २०२३ पासून हिंसाचार सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. त्या राज्यात सर्वत्र संघर्ष सुरू आहेत. तिथे गुंतवणूक होईल का? पर्यटनात वाढ होईल का? नाही. भाजप महाराष्ट्रावरही तीच परिस्थितीत आणू इच्छित आहे.”

दरम्यान, कालही आदित्य ठाकरे यांनी,”राज्याची कायदा आणि सुव्यवस्था पूर्वी कधीही नव्हती इतकी ढासळली असून, मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांचे शहर असलेले नागपूर या परिस्थितीला तोंड देत आहे”, असे म्हटले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here