पाकिस्तानमधील बलुचिस्तानमध्ये पुन्हा एकदा पाकिस्तानी लष्कराच्या ताफ्यावर मोठा हल्ला करण्यात आला आहे. नोशकी जिल्ह्यात पाकिस्तानी लष्कराच्या ताफ्यावर हा हल्ला करण्यात आला. त्यानंतर मोठ्या प्रमाणात गोळीबार करण्यात आला. हे पाकिस्तानी सैनिक क्वेट्टावरून तफ्तानकडे जात होते. किमान ७ पाकिस्तानी सैनिक ठार झाले असून २१ जण जखमी झाल्याची माहिती दिली जात आहे. अधिकृत सूत्रांनी ७ जणांच्या मृत्यूची पुष्टी केल्याचं वृत्त समोर आलं आहे.
बलुच लिबरेशन आर्मीने (बीएलए) या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली असून या हल्ल्यात ९० पाकिस्तानी जवानांचा मृत्यू झाल्याचा दावा केला आहे. एका पाकिस्तानी अधिकाऱ्याने दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, “क्वेट्टाहून तफ्तानला जाणाऱ्या सुरक्षा दलांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात ७ बस आणि दोन वाहनांचा समावेश असलेल्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला. एका बसला आयईडीने भरलेल्या वाहनाने धडक दिली, कदाचित हा आत्मघातकी हल्ला होता, तर दुसऱ्या बसला रॉकेट-प्रोपेल्ड ग्रेनेड्स (आरपीजी) ने लक्ष्य केलं”, असं म्हटलं आहे.