महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी योजना म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना. पण या योजनेचा परिणाम इतर योजनांवर होताना दिसत आहे. आता या योजनेचा फटका शेतकऱ्यांनाही बसतोय का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण, ठिबक सिंचन योजनेसाठी देण्यात येणारे अनुदान गेल्या वर्षभरापासून शेतकऱ्यांना मिळालेले नाही. याचा फटका विशेषतः मराठवाड्यातील शेतकऱ्यांना बसत आहे. या अनुदानाच्या विलंबामुळे शेतकऱ्यांना ठिबक सिंचनाचा लाभ घेता येत नाही, परिणामी जलसंधारणाच्या उद्दिष्टांवरही परिणाम होत आहे. त्यामुळे सरकारने या प्रश्नावर तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.

लाडक्या भावाचं काय?
राज्यात महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी “मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना” अंतर्गत लाखो प्रशिक्षणार्थींना विविध सरकारी कार्यालयांत नेमले होते. मात्र, सहा महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर या तरुणांना कामावरून कमी करण्यात येत आहे, त्यामुळे मोठ्या संख्येने तरुण बेरोजगार होणार आहेत. याविरोधात सांगलीत प्रशिक्षणार्थी तरुणांचा राज्यव्यापी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. लाडक्या बहिणीसाठी लाडक्या भावाकडे दुर्लक्ष करू नका!” असा संदेश या तरुणांकडून सरकारला दिला जात आहे.
विरोधकांचा हल्लाबोल
“लाडकी बहीण” योजनेमुळे इतर योजनांना फटका बसत असल्याने विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. शिवभोजन योजनेसारख्या योजनांना आळा घालण्याचे कारण लाडकी बहीण योजना असल्याचा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तर “ही योजना बहिणींसाठी नव्हे, तर सत्तेसाठी होती”, असा घणाघात माजी आमदार बच्चू कडू यांनी केला.