मागील सोमवारी नागपुरात मोठा हिंसाचार उफाळला होता. या हिंसाचारात अनेक भागात जाळपोळ, दगडफेकीच्या घटनाही घडल्या, या हिंसाचारासाठी फहीम खान यानेच ठिणगी टाकल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. यशोधरानगरमधील संजयबाग कॉलनीतील त्याच्या घरात अनधिकृत बांधकाम झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे महापालिकेने त्याला नोटीस जारी कऱण्यात आली. या नोटीसीनंतर आज त्याच्या घरावरील अनधिकृत बांधकाम हटविण्यासाठी बुलडोझरची कारवाई सुरू झाली आहे. उत्तर प्रदेशप्रमाणेच नागपुरातही गुन्हेगारांविरोधात कठोर पावले उचलण्याच्या दृष्टीने ही कारवाई होत असल्याची चर्चा आहे. नागपूर महानगरपालिकेच्या पथकाकडून फहीम खानच्या घरावर तोडकामाची कारवाई प्रत्यक्ष सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, तोडकामापूर्वी फहीम खानच्या कुटुंबियांना नोटीस देण्यात आली होती. त्यानंतर त्याच्या कुटुंबियांनी रात्रीच घर रिकामे केले होते. हे घर फहीम खानच्या आईच्या नावावर होते. कारवाईपूर्वी कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखावी, यासाठी यशोधरानगर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यात स्थानिक पोलिसांसह एसआरपीएफच्या दोन तुकड्यांचा समावेश आहे.
दरम्यान दोन दिवसांपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही बुलडोझर कारवाईचा इशारा दिला होता. ‘हिंसाचारात सहभागी असलेल्यांना धडा शिकवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. विशेषतः ज्यांनी पोलिसांवर हल्ला केला आहे त्यांना आम्ही सोडणार नाही. असा इशारा फडणवीसांनी दिला होता.