२०२४ साली प्रदर्शित झालेल्या ‘चंदू चॅम्पियन’ या बायोपिकमध्ये अभिनेता कार्तिक आर्यनने भारताचे पहिले पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेते मुरलीकांत पेटकर यांची भूमिका साकारली होती. मात्र या भूमिकेसाठी पहिली पसंत कार्तिक आर्यन नव्हे तर दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत हा होता. अलीकडेच एका मुलाखतीत हा खुलासा करण्यात आला आहे.
अभिनेता भुवन अरोराने एका मुलाखतीत उघड केले की, या चित्रपटाच्या कथेचे हक्क सुशांतने स्वतः मुरलीकांत पेटकर यांच्याकडून विकत घेतले होते. सुशांतला अशा प्रेरणादायी भूमिका साकारायला खूप आवडत होत्या. याआधी त्याने ‘एम.एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी’मध्ये महेंद्रसिंग धोनी यांची भूमिका साकारली होती आणि तो चित्रपट प्रचंड गाजलादेखील होता. भुवन अरोरा म्हणाला की, एकदा विमानतळावर त्याची आणि सुशांतशी भेट झाली होती. त्यावेळी दोघांमध्ये अभिनय आणि नवीन विषयांवर चर्चा झाली. त्यावेळीच सुशांतने सांगितले की तो एका पॅरालिम्पिक जलतरणपटूच्या आयुष्यावर आधारित चित्रपट करणार आहे. त्याच क्षणी त्याने ‘चंदू चॅम्पियन’च्या संकल्पनेचा उल्लेख केला होता.सुशांतने पेटकर यांची कथा सिनेमारुपात आणण्याची योजना आखली होती. पण १४ जून २०२० रोजी त्याच्या दुर्दैवी मृत्यूनंतर हे स्वप्न अर्धवट राहिले. त्यानंतर ही कल्पना दिग्दर्शक कबीर खान आणि निर्माते साजिद नाडियाडवाला यांनी पुढे नेली आणि कार्तिक आर्यनला मुख्य भूमिकेत घेण्यात आले.