विकी कौशलची मुख्य भूमिका असलेल्या ‘छावा’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सुरुवातीलाच चांगला गल्ला जमवला. पहिल्या दिवसाच्या तुलनेत दुसऱ्या दिवशी कमाईत मोठी वाढ झाली. आता ‘छावा’च्या तिसऱ्या दिवसाच्या कमाईची आकडेवारी समोर आली आहे. आधीच्या दोन्ही दिवसांच्या तुलनेत रविवारी चित्रपटाने जास्त कलेक्शन केले आहे. चित्रपटाचं प्रचंड कौतुक होत आहे, तसेच कमाईतही सातत्याने वाढ होत आहे.
‘छावा’ सिनेमाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी, शुक्रवारी भारतात ३३.१ कोटी रुपये कमावले. दुसऱ्या दिवशी कलेक्शनमध्ये वाढ झाली. शनिवारी ‘छावा’ने तब्बल ३९.३ कोटी रुपये कमावले. रिलीजनंतरच्या पहिल्या रविवारी म्हणजेच तिसऱ्या दिवशी ‘छावा’ने ४८.५ कोटी रुपये कमावले, अशी माहिती इंडस्ट्री ट्रॅकर सॅकनिल्कने दिली आहे. चित्रपटाचे तीन दिवसांचे भारतातील कलेक्शन ११६.५ कोटी रुपये झाले आहे. तिसऱ्या दिवसाची आकडेवारी ही प्रारंभिक आहे, त्यामुळे यात बदल होण्याची शक्यता आहे.