राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर वातावरण चांगलंच तापलं आहे. महायुतीच्या बाजूने एकतर्फी निकाल लागल्याने महाविकास आघाडीने आरोपांची मालिका सुरू केली आहे. अजूनही महाराष्ट्राच्या निकालावर संशय व्यक्त केला जात आहे. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी खासदार सुप्रिया सुळे व खासदार संजय राऊत यांच्यासोबत पत्रकार परिषद घेतली आहे. यावेळी त्यांनी निवडणूक आयोगाकडे मतदारांची संख्येवरुन संशय व्यक्त केला आहे. यावर आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह खासदार औद्योगिक महोत्सवा’चे उदघाटन केले. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधून राहुल गांधी यांच्या आरोपावर सडकून टीका केली आहे. ‘जब एक ही चुटकुला बार बार सुनाया जाए तो उसपर हंसा नही करते’ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर अशी खोचक पोस्ट करत त्यांनी टीका केली.
जब एक ही चुटकुला बार-बार सुनाया जाए तो उसपर हंसा नहीं करते!#RahulGandhi @RahulGandhi
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 7, 2025
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “दिल्लीमध्ये कॉंग्रेसचा पराभव दिसू लागल्यामुळे राहुल गांधींचं हे कव्हर फायरिंग सुरु आहे. राहुल गांधी यांनी आत्मचिंतन करावं. किती मतदार वाढले आणि कुठे अन् कसे वाढले हे निवडणूक आयोगाने सांगितलं आहे. आता ही जी तयारी सुरु आहे ती दिल्लीमध्ये प्रचंड पराभव होणार असल्यामुळे आहे. मी वारंवार सांगतो आहे त्यांनी आत्मचिंतन करावं. त्यांनी मनाची खोटी समजूत काढत राहतील तोपर्यंत जनतेचे समर्थन त्यांना कधीच मिळणार नाही,” असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.