दिल्ली, महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशमध्ये एकाएकी कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. या राज्यातील सर्वच शासकीय आणि निमशासकीय रुग्णालयांना सतर्क राहण्याचे आदेश प्रशासनानं जारी केले आहेत. सध्याच्या घडीला भारतात कोरोनाच्या NB.1.8.1 आणि LF.7 या नव्या कोरोना व्हेरिएंटचा संसर्ग होत आहे. मुंबईतसुद्धा अनेक रुग्णांना या संसर्गाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे.
ठाण्यात रविवारी ११ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली. . यापैकी एकावर छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात, तर उर्वरित सहा जणांवर खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. त्यामुळे ठाण्यातील एकूण बाधितांची संख्या आता ३० वर पोहोचली आहे. दरम्यान कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील एका डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली असून, त्यांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. रुग्णालयाच्या आवारातच ते वास्तव्य करत असल्यामुळे त्वरित खबरदारी घेण्यात आली आहे. येथील डॉक्टरांची प्रकृती स्थिर असून, त्यांच्यावर योग्य उपचार सुरू असल्याची माहिती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राकेश बारोट यांनी दिली. डोंबिवलीतही रविवारी कोरोनाच्य रुग्णाची नोंद करण्यात आली आहे.