वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामधील आरोपी पती, सासू आणि नणंदेच्या पोलीस कोठडीमध्ये वाढ करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. आता हे तिघेही २८ मेपर्यंत पोलीस कोठडीमध्येच राहणार आहेत. शवविच्छेदन अहवालात समोर आलेल्या धक्कादायक माहितीच्या आधारेच पोलिसांनी सासू, पती आणि नणंदेची पोलीस कोठडी वाढवून देण्याची मागणी केली होती. पोलिसांनी न्यायालयासमोर युक्तीवाद करताना शवविच्छेदन अहवालातील धक्कादायक तपशील कथन केला. वैष्णवीच्या शरीरावर मारहाणी झाल्याच्या एकूण ३० खुणा पोस्टमॉर्टम दरम्यान आढळून आल्या. वैष्णवीच्या अंगावरील जखमांपैकी १५ जखमा या तिने आत्महत्या करण्यापूर्वीच्या २४ तासांच्या आतील असल्याचं पोस्टमॉर्टम अहवालात म्हटलं असल्याचं पोलिसांनी न्यायालयात बाजू मांडताना स्पष्ट केलं.
वैष्णवीच्या अंगावरील जखमांपैकी एक जखम तिच्या मृत्यूच्या सहा दिवस आधीच झाली होती असं अहवालामध्ये म्हटलं आहे. वैष्णवीच्या शरीरावरील ११ जखमा या ५ ते ६ दिवसांपूर्वीच्या आहेत. या जखमांपैकी दोन जखमा या तीन ते सहा दिवसांपूर्वीच्या असल्याचं शवविच्छेदन अहवालात नमूद करण्यात आलं आहे. त्यामुळेच सखोल चौकशीसाठी आरोपींची पोलीस कोठडी वाढवून देण्याची मागणी पोलिसांनी केली होती.