शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक आणि वादग्रस्त वक्तव्यांनी चर्चेत राहणाऱ्या संभाजी भिडे गुरुजींनी पुन्हा एकदा देशाचा ध्वज तिंरगा नसून भगवा असायला पाहिजे असे वक्तव्य केलं आहे. कोल्हापूर येथील आंदोलनावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा इतिहास सांगत मराठ्यांनी दिल्लीच्या तख्तावर भगवा फडकवला होता. त्यामुळे, हिंदुस्थानचा राष्ट्रध्वज भगवा आहे, असे संभाजी भिडेंनी म्हटलं आहे. या देशात जो महायज्ञ सुरू आहे, तो विझू देता कामा नये. या महायज्ञाची सांगता, या देशाच्या शीर्षस्थानी भगवा झेंडा आला पाहिजे अशी करायची आहे, असेही त्यांनी म्हटले.
डोळ्यांसमोर छत्रपती संभाजीराजे, छत्रपती शिवाजी महाराज आहेत. त्यांच्या कामाची तीव्रता ही सूर्याच्या तेजासारखी आहे, ती मावळणार नाही. आता स्वातंत्र्य आहे, परंतु आम्हाला चंद्र हवा. एका माऊलीने रामाच्या हातात आरसा दिला आणि हातातील आरशात चंद्र पाहून राम थंड झाला तर असं होता कामा नये. काशीचा विश्वेश्वर पुन्हा निर्माण करुन पाकिस्तानचा नायनाट करु, हे स्वातंत्र्य भगव्या झेंड्याचे उत्पन्न करणारे उपोषण आहे, असे संभाजी भिडे यांनी आपल्या भाषणात म्हटले.