आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून क्रमवारी जाहीर! टॉप 5 मध्ये 3 भारतीय फलंदाजांचा समावेश

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 दरम्यान क्रमवारी जाहीर केली आहे. भारतीय खेळाडूंसाठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. दुबई येथे खेळल्या जाणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 दरम्यान 26 फेब्रुवारी रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने अपडेट केलेल्या एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय सुपरस्टार फलंदाज विराट कोहलीला मोठा फायदा झाला आहे. 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तानविरुद्ध मॅचविनिंग शतक झळकावल्यानंतर कोहलीने डॅरिल मिशेलला मागे टाकत पाचवे स्थान मिळवले आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी विराट कोहली सहाव्या क्रमांकावर होता. परंतु पाकिस्तानविरुद्धच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे त्याने आयसीसी क्रमवारीत झेप घेतली आहे. 242 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कोहलीने 111 चेंडूत नाबाद 100 धावा केल्या. आयसीसी स्पर्धेत पाकिस्तानविरुद्धचे हे त्याचे पहिलेच शतक होते.

शुभमन गिल अव्वल स्थानी कायम

भारताचा युवा स्टार शुभमन गिलने आयसीसी एकदिवसीय फलंदाजी क्रमवारीत आपले अव्वल स्थान मजबूत केले आहे. गिलने चॅम्पियन्स ट्रॉफीची सुरुवात बांगलादेशविरुद्ध शतकाने केली आणि पाकिस्तानविरुद्ध 46 धावांची धमाकेदार खेळी केली. त्याचे आता 817 रेटिंग गुण आहेत आणि ते दुसऱ्या स्थानावर असलेल्या बाबर आझमपेक्षा 47 गुणांनी जास्त आहेत.

भारतीय कर्णधार रोहित शर्मानेही आयसीसी क्रमवारीत आपले तिसरे स्थान कायम ठेवले आहे. आयसीसी एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत टॉप-5मध्ये तीन भारतीय फलंदाजांचा समावेश आहे आणि यावरून भारतीय क्रिकेट संघाच्या ताकदीचा अंदाज येतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here