पुण्यातील शिवाजीनगर भागातील एका एटीएम केंद्रातून पैसे काढणाऱ्या महिलेकडे बतावणी करुन चोरट्यांनी खात्यातून ८० हजार रुपयांची रोकड चोरुन नेल्याची घटना उघडकीस आली आहे. राज्यात फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. याबाबत ४२ वर्षीय महिलेने शिवाजीनगर पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यानूसार, अज्ञातावर गुन्हा नोंदवला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार महिला दौंडमध्ये राहतात. पुण्यात कामानिमित्त आल्या होत्या. शिवाजीनगर येथील वीर चापेकर चौकातील एटीएमध्ये पैसे काढण्यास गेल्या होत्या. तेव्हा चोरटा एटीएम केंद्रात शिरला. त्याने मदतीच्या बहाण्याने महिलेकडून एटीएम कार्ड घेतले. सोबत त्यांचा पासवर्डही घेतला. पण, तुमच्या खात्यातून पैसे निघत नसल्याचे सांगितले आणि हातचालाखी करून दुसरेच कार्ड त्यांना परत दिले. एटीएम मशिनमधून बाहेर पडल्यानंतर तक्रारदार यांच्या खात्यातून ८० हजार रुपये काढल्याचे निदर्शनास आले. तेव्हा त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले. पुढील तपास पोलीस करत आहेत.