पुण्यातील स्वारगेट एसटी स्थानकावर उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये एका २६ वर्षीय तरुणीवर मंगळवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास बलात्कार झाला. बलात्कारानंतर हा आरोपी जवळपास तीन दिवस पोलिसांना चकवा देत होता. अखेर सीसीटीव्ही फुटेज, श्वान पथक आणि ड्रोनच्या सहाय्याने पोलिसांनी आरोपीला गुणाट गावातून मध्यरात्री अटक केली. दरम्यान, त्याच्या अटकेचा थरार सुरू असताना त्याने झाल्या प्रकाराबाबत माफी मागितली असून स्वतःची चूकही कबूल केली. तसंच, माझ्या मुलाकडे लक्ष द्या, अशी विनंतही त्याने गावकऱ्यांना केली. याबाबत स्थानिक गावकऱ्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते एका वृत्त वाहिनीशी बोलत होते.
“आम्ही त्याला आवाज दिला. आवाज दिल्यानंतर तो अंधारातून आला”, असं एका गावकऱ्याने सांगितलं. तर, दत्तात्रय गाडेला अटक करण्याआधी पोलिसांनी माझी चौकशी केली होती, दमदाटी करून दत्तात्रय गाडेविषयी विचारलं होतं, असंही या ग्रामस्थाने सांगितलं.
“दत्तात्रय गाडे दोन ते तीन दिवस पोलिसांना चकवा देत होता. अचानक गणेश गवाणे इथे बसलेले असताना त्याला आवाज आला. त्यामुळे आम्ही त्याला सर्वांनी मिळून धरलं. तो स्वतःहूनच समोर आला होता”, अशीही प्रतिक्रिया दुसऱ्या ग्रामस्थाने दिली.