दिल्लीच्या नवनिर्वाचित मुख्यमंत्र्यांचं ‘ते’ वक्तव्य अन् सभागृहात एकच हशा

दिल्लीच्या नवनिर्वाचित मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. रेखा गुप्ता यांनी पदभार स्वीकारून २० दिवस झाले आहेत. या २० दिवसांत त्यांनी दिल्लीकरांना पुढील पाच वर्षांमध्ये कोण-कोणती कामे केली जातील, कोणत्या योजना आणल्या जातील, निवडणुकीआधी दिलेल्या कोणत्या आश्वासनांवर सर्वात आधी काम केलं जाईल याबाबत माहिती दिली. एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा उल्लेख करत एक वक्तव्य केलं, जे ऐकून सभागृहात एकच हशा पिकला.

रेखा गुप्ता म्हणाल्या, “मी आत्ता गृहमंत्र्यांना भेटणार होते. आमची भेटीची वेळ निश्चित होती. परंतु, इथे येण्यासाठी मी त्या भेटीसाठी जाण्यास नकार दिला. मी गृहमंत्र्यांना कळवलं की आज आम्ही आमच्या भागात कार्यकर्त्यांचे आभार मानण्यासाठी एका कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे आणि मला त्या कार्यक्रमाला जावं लागेल. त्यामुळे मी आजच्या भेटीसाठी येऊ शकणार नाही. मला भेटीसाठी दुसरी वेळ द्या. जरा विचार करा, मी थेट गृहमंत्र्यांना भेटीसाठी नकार देऊन इथे आले आहे. माझ्या हिंमतीला दाद द्याठ”. रेखा गुप्ता यांचं हे वाक्य ऐकून कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या लोकांना हसु फुटले.

दरम्यान, शालीमार बाग क्लब सोसायटी येथे आयोजित या कार्यक्रमात त्यांनी आणखी एक घोषणा केली. त्या म्हणाल्या, “आपल्या यमुना नदीत लवकरच क्रूज सेवा सुरू केली जाणार आहे. एका छोट्या क्रूजच्या फेऱ्या चालवल्या जाणार आहेत. पुढच्या तीन ते चार महिन्यांमध्ये ही क्रूज सेवा सुरू होईल.” याबाबतच्या सामंजस्य करारावरही त्यांनी स्वाक्षरी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here