देशाची राजधानी दिल्लीच्या निकालाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. यंदातरी भाजपचा 27 वर्षांचा वनवास संपेल की नाही हा प्रश्न होता. मात्र, भाजपने या निवडणुकीत अत्यंत आश्चर्यकारकपणे मुसंडी मारत बहुमताचा आकडा गाठला आहे.
तर, आम आदमी पार्टीचा सुपडा साफ झालेला दिसत आहे. केजरीवाल यांच्या ‘आप’ची दिल्लीतून सत्ता गेली आहे. 10 वर्षानंतर ‘आप’ला सतेत्तून बाहेर जावं लागलं आहे. दिल्लीत मोदींची जादू चालली असून आप चा पराभव झाला आहे. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचाही पराभव झाला आहे. सध्याच्या निकालांनुसार, भाजप 48 जागांवर आघाडीवर आहे, तर आपकडे फक्त 22 जागा आल्या आहेत.

अनेक धक्कादायक निकाल समोर आले आहेत.आपचे उमेदवार सौरभ भारद्वाज ग्रेटर कैलासमधून हरले आहेत. येथे भाजपच्या शिखा राय विजयी झाल्या आहेत. नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आपचे अरविंद केजरीवाल यांचा पराभव झाला आहे. भाजपचे प्रवेश शर्मा यांनी केजरीवालांचा पराभव केला आहे. आपचा मोठा चेहरा असलेले उमेदवार मनीष सिसोदिया यांचा जंगपुरा मतदारसंघातून मोठा पराभव झाल आहे, येथून भाजप उमेदवार तरविंदर सिंह मारवाह विजयी झाले आहेत. मुख्यमंत्री आतिशी कालकाजी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकल्या आहेत, आतिशी यांनी येथे भाजपचे उमेदवार रमेश बिधुरी यांचा पराभव केला.
विशेष म्हणजे या निवडणुकीत काँग्रेसला भोपळाही फोडता आलेला नाही. त्यामुळे तब्बल 27 वर्षानंतर नवी दिल्लीत भाजपचे कमळ फुलले आहे. या निकालानंतर दिल्लीत भाजपची एकहाती सत्ता येणार असल्याचे निश्चित झाले आहे.