दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने अभूतपूर्व असं यश मिळवलं आहे. 26 वर्षांनी भाजपने दिल्लीत सत्ता खेचून आणली. आपच्या अनेक महत्वाच्या नेत्यांचा यंदा पराभव झाला. स्वतः अरविंद केजरीवाल यांना झटका बसला आहे.
एक्झिट पोलमध्ये देखील या निवडणुकीत भाजपाला बहुमत मिळेल असे सांगण्यात आले होते. तर आपकडून या निवडणुकीत सलग तिसर्यांचा सत्तेत येण्यासाठी प्रयत्न केले जात होते. दरम्यान सध्या दिल्ली निवडणूक निकाल सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे. यादरम्यान अरविंद केजरीवाल यांचा जुनम्हा व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ते भारतीय जनता पक्ष आपला या जन्मात कधीही पराभूत करू शकणार नाही असे म्हणताना दिसत आहेत.
केजरीवाल नेमकं काय म्हणाले होते?
2023 मध्ये पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करताना अरविंद केजरीवाल म्हणाले होते की, “…आम आदमी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना अटक करून पक्षात अस्थिरता निर्माण करून नरेंद्र मोदी यांना दिल्लीत आपले सरकार स्थापन करायचे आहे. त्यांना माहिती आहे की निवडणूकीत ते ‘आप’ला हरवू शकत नाहीत. मला त्यांना सांगायचे आहे की केजरीवालला जेलमध्ये टाकले तरी तुरूंगातून आम आदमी पक्ष निवडणूक जिंकेल. “मी नरेंद्र मोदींना सांगू इच्छितो की मोदीजी तुम्ही या जन्मात तरी दिल्लीत आम आदमी पक्षाला पराभूत करू शकणार नाहीत. तुम्हाला दुसरा जन्म घ्यावा लागेल.”