ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे महिला खंडणी प्रकरणी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सुप्रिया सुळे यांच्यावर गंभीर आरोप केला. सदर आरोपी महिला आणि तिच्याबरोबर असलेले काही सहकारी हे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांच्या संपर्कात असल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. त्यांच्या या आरोपानंतर आता आमदार रोहित पवार यांनी विधानसभेत बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. ‘सदर महिलेच्या न्यायासाठी एक ते दोन फोन झाले असतील. पण हा विषय पारदर्शकपणे हाताळाला गेला पाहिजे’, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
“काही वेळापूर्वी एका विषयाच्यासंदर्भात बोलताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझं (रोहित पवार) नाव घेतलं, तसेच खासदार सुप्रिया सुळे यांचं देखील नाव घेतलं. तो विषय आमच्याकडे आला, आम्हाला सांगण्यात आलं की त्या महिलेला न्याय मिळाला पाहिजे. तसेच पत्रकारालाही न्याय मिळाला पाहिजे. यासाठी आम्ही एक किंवा दोन फोन केले असतील. पण शंभर ते दोनशे फोन केले गेले नाहीत. आता तेथे कारवाई सुरू आहे. पण हा विषय फक्त पारदर्शकपणे हाताळायला हवा, जे खरं आहे ते लोकांसमोर यावं”, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.