राज आणि उद्धव मनोमिलनात येणार नवा ट्विस्ट? फडणवीस यांनी केली खेळी

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची शिवसेना एकत्र येतील अशी चर्चा सध्या राज्याच्या राजकारणामध्ये आहे. असं असतानाच आता या मनोमिलनामध्ये ट्विस्ट येईल की काय अशी घडामोड आज मुंबईत घडली. मुंबईतील एका आलिशान हॉटेलमध्ये सकाळी दहाच्या सुमारास अचानक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतल्याचं सांगितलं जात आहे. राज ठाकरेंच्या कार मागोमाग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा ताफा या हॉटेलमध्ये दाखल झाल्याचं वृत्त आहे.

मुंबईतील वांद्रे येथील ‘हॉटेल ताज लँड एण्ड’ या पंचतारांकित हॉटेलमध्ये फडणवीस यांनी राज ठाकरेंची भेट घेतल्याचं वृत्त आहे. दोन्ही नेत्यांमध्ये राजकीय चर्चा झाल्याची माहीत मिळत आहे. राज ठाकरेंची आज दुपारी मनसे पदाधिकाऱ्यांसोबत बैठक होणार आहे. त्यापूर्वीच राज ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांची बैठक झाल्याने राज ठाकरे आज पदाधिकाऱ्यांबरोबर नेमकं काय बोलणार याकडे विशेष लक्ष लागून आहे. आता फडणवीसांच्या या राजकीय खेळीने दोन्ही सेनांच्या युतीचा डाव फसणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here