उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळातील काही निर्णयांना देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिल्याची व त्यांच्या कार्यकाळातील कामांची चौकशी सुरू करण्यात आल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून आहे. तसेच तानाजी सावंत यांच्या कार्यकाळातील तब्बल ३१९० कोटींच्या कामांना राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिल्याचीही चर्चा आहे. आता या चर्चांवर आता अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्णविराम लावला आहे. तसेच विकास कामांना स्थगिती द्यायला मी काय उद्धव ठाकरे आहे का? असा प्रश्न करत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “गेल्या काही दिवसांपासून माध्यमांची एक आवडती बातमी झाली आहे. काही झालं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदे यांच्या कामांना स्थगिती दिली. पहिल्यांदा हे लक्षात घेतलं पाहिजे की, कामांना स्थगिती देण्यासाठी मी काही उद्धव ठाकरे नाही. याआधीही मी स्पष्ट केलं आहे की जे राज्याच्या हिताचं आहे ते काम सुरु करत असताना एकनाथ शिंदे यांच्याबरोबर मी देखील होतो, त्यानंतर अजित पवार हे देखील आले. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात जे निर्णय घेतले, त्या निर्णयांची जबाबदारी फक्त एकनाथ शिंदे यांची नाही, तर आमच्या तिघांचीही जबाबदारी आहे”.