ओपनएआयच्या चॅट जीपीटीने घिब्ली स्टुडिओ अशी नवीन सेवा सुरू केली आहे. सध्या जगभरातील सर्वच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर चॅट जीपीटीच्या घिब्ली जनरेटेड कलाकृतींचा पूर आल्याचे पाहायला मिळत आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही चॅट जीपीटीच्या घिब्लीची भूरळ पडली असून, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबरचा घिब्ली शैलीतील छायाचित्र एक्सवर शेअर केले आहे. या छायाचित्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि कन्या दिविजा दिसत आहेत.
अनेक युजर्स याचा वापर करून त्यांच्या कुटुंबातील सदस्य, मित्र आणि इतरांचे एआय-जनरेटेड घिब्ली शैलीतील छायाचित्र तयार करत आहेत. इतकेच नव्हे तर अनेक बड्या ब्रँड्सना देखील या ट्रेंडची भुरळ पडली असून, ते याचा वापर त्यांच्या जाहिरातीसाठी करत असल्याचे पाहायला मिळत आहे. चॅट जीपीटीवरील या नवीन वैशिष्ट्यामुळे युजर्स मोठ्या प्रमाणात घिब्ली शैलीतील एआय जनरेटेड छायाचित्र तयार करून सोशल मीडियावर शेअर करत आहेत.