दिल्लीमध्ये राहुल गांधी यांच्या घरी झालेल्या बैठकीत मतदार याद्यांमधील घोळ आणि निवडणूक आयोगासंदर्भातील सादरीकरण देण्यात आलं. यावेळी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांना रांगेत शेवटी बसवण्यात आल्याने चर्चेला उधाण आलं आहे. भाजपानेही हा मुद्दा उचलून धरत उद्धव ठाकरेंवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमच्याकडे असताना ते पहिल्या रांगेत होते असा टोला लगावला आहे.
देवेंद्र फडणवीस यांना उद्धव ठाकरेंना मागे बसवण्यासंदर्भात विचारलं असता ते म्हणाले की, “आमच्याकडे तर ते नेहमी पहिल्या रांगेत राहिले. आमच्याकडे तर आमच्या आधीही ते राहिले. त्याच्यामुळे आता तिथे त्यांचा काय मान, सन्मान आहे हे तुमच्या लक्षात आलंच आहे. भाषणात दिल्लीसमोर मान झुकणार नाही, पायघड्या टाकणार नाही असं म्हणायचं. पण आता सत्तेत नसता दिल्लीत काय स्थिती आहे? हे पाहून थोडं दु:ख होतं,” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.