अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेताच निर्णयांचा धडाका लावला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा आयात शुल्काबाबत ‘धमकी’अस्त्र डागले आहे. ट्रम्प यांनी आपल्या विधानात चीन, भारत आणि ब्राझीलचा उल्लेख केला असून भारताचा समावेश अशा देशांच्या यादीत केला आहे ज्यांच्या उच्च शुल्कामुळे देशाचे नुकसान होत आहे. राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर ट्रम्प यांनी उच्च शुल्काच्या मुद्द्यावर भारत आणि चीनशी मवाळ न राहण्याचा स्पष्ट संदेश दिला.
मोठे कर लादण्याचे संकेत
अमेरिकेला नुकसान पोहोचवणाऱ्या देशांवर आम्ही कर लादू, असा इशारा ट्रम्प यांनी दिला होता. आणि त्या दृष्टीने त्यांनी आता पावलं उचलली आहेत. ट्रम्प यांनी कॅनडा आणि मेक्सिकोमधून येणाऱ्या वस्तूंवर 25% शुल्क (टॅक्स) लादण्याची घोषणा केली तर, 1 फेब्रुवारीपासून चिनी वस्तूंवरील कर 10% वाढवण्यात येणार आहे. तर यापूर्वी त्यांनी ब्रिक्स देशांवर 100 % शुल्क लादण्याचे विधान केले होते.
ब्रिक्स देशांमध्ये भारताचाही समावेश असून ट्रम्प यांनी असेही म्हटले आहे की बेकायदेशीर स्थलांतरितांच्या मुद्द्याबाबत भारतासोबत चर्चा सुरू आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी या प्रकरणात योग्य पावले उचलतील.
अमेरिका प्रथम यानुसार अमेरिकेला नुकसान पोहोचवणारी कोणतीही गोष्ट आम्ही सहन करणार नाही. असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केलंय. फ्लोरिडामध्ये रिपब्लिकन पक्षाच्या कार्यक्रमादरम्यान ट्रम्प यांनी हे विधान केलं.
दुसऱ्यांदा अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर ट्रम्प यांनी रिपब्लिकन पक्षाला संबोधले.