अमेरिकेत ट्रम्प सरकार सत्तेवर आल्यापासून निर्णयांचा धडाका पाहायला मिळत आहे. रोज नवनवे निर्णय घेतले जात आहेत. आता ट्रम्प सरकारने पॅलेस्टाईनचे समर्थन करणाऱ्या विद्यार्थ्यांना दणका द्यायचं ठरवलं आहे. याबाबतीत ट्रम्प सरकारने जहाल भूमिका घेतली असून पॅलेस्टाईन हमास समर्थक विद्यार्थ्यांचा व्हिसा रद्द करणार आहे.
व्हाईट हाऊसच्या एका अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, पॅलेस्टाईनचे समर्थन करत निदर्शनांमध्ये सहभागी झालेल्या स्थलांतरित महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आणि इतर परदेशी लोकांना हद्दपार करण्यास सुरुवात केली जाणार आहे.
ट्रम्प यांनी एका पत्रकात म्हटले आहे की हमास आणि इस्रायल युद्धादरम्यान अमेरिकेत अनेक निदर्शनं केली होती. संस्थांच्या कट्टरता वादामुळे प्रभावित झालेल्या कॉलेज कॅम्पसमधील सर्व हमास समर्थक विद्यार्थ्यांचे व्हिसा मी तात्काळ रद्द करणार आहे. आम्ही तुम्हाला शोधून काढू आणि अमेरिकेतून तुम्हाला हद्दपार करू असं ते म्हणाले.
ट्रम्प सरकारचे अमेरिका प्रथम हे धोरण आहे. या धोरणानुसार अमेरिकेला धोका पोहोचणाऱ्या आणि विकासाला बाधा आणणाऱ्या कोणत्याही गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाही हे आधीच स्पष्ट केलं आहे. त्यानुसार ट्रम्प सरकार एक एक पाऊल टाकत आहे.