डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी बेकायदा स्थलांतरीतांची घरवापसी आणि इतर देशांवर टेरीफ लागू करणे या मुद्द्यावरून भारताशी असलेल्या संबंधांबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. अमेरिकेतील संकेतस्थळ ‘ब्रेईटबार्ट न्यूज’ला दिलेल्या मुलाखतीत याबाबत सविस्तर भाष्य केलं. यावेळी ते म्हणाले, “माझे भारताशी खूप चांगले संबंध आहेत, पण फक्त एक समस्या आहे. भारत हा जगातला सर्वाधिक टेरिफ दर आकारणाऱ्या देशांपैकी एक देश आहे. मला विश्वास आहे की ते कदाचित आगामी काळात त्यांचे टेरिफ दर कमी करण्याची शक्यता आहे. पण २ एप्रिलपासून अमेरिकेकडून भारतावर तेवढेच दर आकारले जातील, जेवढे दर ते आमच्यावर आकारतात”.
दरम्यान, इंडिया-मिडल इस्ट-युरोप इकोनॉमिक कॉरिडॉर अर्थात आयएमईसीबद्दल बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी सकारात्मक भूमिका मांडली. “हा एक अतिशय उत्तम देशांचा समूह आहे. व्यापारविषयक बाबतीत आमच्या हितसंबंधांना धक्का लावणाऱ्या देशांचा सामना या गटाकडून केला जातो. व्यापार क्षेत्रात आमचे खूप खंबीर सहकारी आहेत”, असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.