अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरू केलेल्या टॅरिफ (आयात शुल्क) वॉरमुळे जगभरातील अनेक देशांचे शेअर बाजार गडगडले आहेत. चीनवर अमेरिकेने सर्वाधिक आयात शुल्क लादलं आहे. त्याच्या प्रत्युत्तरात चीनने अमेरिकन वस्तूंवर आणखी ३४ टक्के आयात शुल्क लावत असल्याची घोषणा केली. त्यानंतर आता डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनी मालावर १०४ टक्के आयात शुल्क लावलं आहे. तसेच अमेरिकेने भारतीय मालावर २७ टक्के आयात शुल्क लावलं आहे. ट्रम्प विविध देशांवर आयात शुल्क लावून थांबले नाहीत. आता त्यांनी फार्मा उत्पादनावर मोठं टॅरिफ लावणार असल्याची घोषणा केली आहे. ट्रम्प यांच्या या घोषणेने अनेक देशांचे धाबे दणाणले आहेत.
भारतावर काय परिणाम होणार?
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी औषधनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांवर आयात शुल्क लागू केलं तर त्याचा भारतावरही परिणाम होईल. अमेरिकेला औषधपुरवठा करणाऱ्या देशांमधील भारत हा सर्वात मोठा पुरवठादार देश आहे. २०२४ मध्ये भारताने तब्बल १२.७२ बिलियन अमेरिकन डॉलर्स किंमतीच्या औषधांची निर्यात केली आहे. त्यापैकी ८.७ बिलियन डॉलर्स किंमतीची औषधे एकट्या अमेरिकेला पाठवण्यात आली आहेत. दुसऱ्या बाजूला भारत अमेरिकेकडून केवळ ८०० मिलियन डॉलर्स किंमतीची औषधे आयात करतो. त्यामुळे अमेरिकेने औषधांवर आयात शुल्क लादल्यास भारतावर त्याचे गंभीर परिणाम होतील.
अमेरिकेतून भारतात आयात केल्या जाणाऱ्या औषधांवर भारत १०.९१ टक्के आयात शुल्क आकारतो. मात्र अमेरिका भारताकडून आयात केल्या जाणाऱ्या औषधांवर कोणत्याही प्रकारचं आयात शुल्क आकारत नाही. याआधी डोनाल्ड ट्रम्प यांनी विविध देशांवर आयात शुल्क लावलं तेव्हा त्यांनी औषधे व इतर फार्मा उत्पादनांना त्यातून वगळलं होतं. मात्र, आता ट्रम्प औषधे व फार्मा उत्पादनांवर आयात शुल्क लावण्याच्या तयारीत आहेत.