सिडकोकडून बांधण्यात येत असलेल्या खारघरच्या जलवायू विहार ते नेरूळ जलवाहतूक जेट्टीपर्यंतचा कोस्टल रोड बेलापूर परिसरात डबल डेकर करता येईल का याचा विचार करावा, अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. हा कोस्टल रोड बेलापूर परिसरात डबल डेकर केल्यास नवी मुंबई विमानतळ, जेएनपीटी परिसरातून नवी मुंबईकडे येणाऱ्या वाहनांमुळे होणारी संभाव्य वाहतूककोंडी दूर होण्यास मदत होणार आहे.
नवी मुंबई महापालिका आणि सिडकोसंदर्भातील विविध प्रश्नांवर तोडगा काढून ते मार्गी लावण्यासाठी वनमंत्री गणेश नाईक यांच्या पुढाकाराने मुख्यमंत्र्यांकडे गुरुवारी एक बैठक पार पडली. यात बैठकीत नवी मुंबईतील विविध प्रश्नांवर चर्चा करून त्यावर उपाय सुचविताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी खारघर-नेरूळ कोस्टल रोड बेलापूर सेक्टर १५ परिसरात डबल डेकर करता येईल, अशी सूचना सिडकोस केली.
कोस्टल रोडसाठी ८.२२ हेक्टर क्षेत्रावरील ११८२ परिपक्व खारफुटीची झाडे बाधित होणार आहेत. पक्ष्यांच्या ७२ प्रजातींचा या परिसरात अधिवास असून, त्यापैकी ४८ स्थलांतरित आणि २४ स्थानिक पक्षी आहेत. डीपीएस, एनआरआय आणि टी. एस. चाणक्य परिसरात फ्लेमिंगोंची संख्या वाढत आहे. पर्यावरण हानी लक्षात घेऊन माजी आमदार संदीप नाईक यांनी या रस्त्याला विरोध केला होता. मात्र, आता मुख्यमंत्री फडणवीस यांनीच हा रस्ता डबल डेकर करण्याची सूचना केल्याने ते कोणती भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे.