मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात आता ड्रेस कोड लागू करण्यात आलाय. मंदिरात शॉर्ट ड्रेस, अंगप्रदर्शन करणारे कपडे घालून आता जाता येणार नाही. ड्रेस कोडबाबत परिपत्रकच सिद्धिविनायक मंदिर प्रशासनाने जारी केलंय. मंदिर परिसरात आध्यात्मिक वातावरण कायम राहावे, यासाठी ही घोषणा करण्यात आल्याचे मंदिराच्या विश्वस्त कमिटीने सांगितलं. यासाठी श्रीसिद्धिविनायक गणपती मंदिर ट्रस्टने औपचारिक ड्रेस कोड जारी केलाय. मंदिरात जाण्यासाठी भाविकांना पारंपरिक किंवा पूर्ण अंग झाकणारे कपडे घालावे लागतील, असे ट्रस्टचे म्हणणे आहे.
सर्व भाविकांना दर्शनादरम्यान कोणताही संकोच वाटू नये तसेच मंदिर परिसराची मर्यादा आणि पावित्र्य राखण्यासाठी ‘ड्रेस कोड’ लागू करण्यात येत असल्याचे ट्रस्टने स्पष्ट केले. मंदिराला देशभरातून दररोज हजारो भाविक भेट देतात आणि त्यापैकी अनेक भक्तांनी पोशाखाबद्दल नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे हा निर्णय घेतल्याचे ट्रस्टचे म्हणणे आहे.
तोकडे कपडे घातल्यास प्रवेश नाही
पुढील आठवड्यापासून लहान किंवा तोकडे कपडे परिधान केलेल्या भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. या संदर्भात अनेक भाविकांनी ट्रस्टला पत्र लिहून अयोग्य कपडे परिधान करून येणाऱ्या लोकांवर आक्षेप घेतला होता. त्यामुळे हा निर्णय घेतल्याचे ट्रस्टचे म्हणणे आहे.
“स्कर्ट किंवा स्टीच जीन्स, शॉर्ट स्कर्ट किंवा ज्या कपड्यांमधून शरीराचे अवयव दिसणारे कपडे परिधान केलेल्या भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही, “अशा भक्तांना मंदिराच्या बाहेरूनच दूर केले जाईल,” असे मंदिर संस्थानाने म्हटले आहे.