म्यानमार आणि बँकॉकमध्ये शुक्रवारी (२८ मार्च) ७.७ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे हादरे बसले. या जोरदार भूकंपानंतर दोन्ही देशात खळबळ उडाली आहे. भारतातही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. म्यानमारमध्ये २० तर बँकॉकमध्ये आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. आता भूकंपानंतरची भीषण दृश्ये समोर येत आहेत. म्यानमार आणि बँकॉकमध्ये अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. तर प्राचीन बौद्ध मंदिरांचेही मोठे नुकसान झाले.
दुपारी ७.७ रिश्टर स्केलच्या भूकंपाचे हादरे बसल्यानंतर त्यापाठोपाठ ६.८ चे धक्के पुन्हा बसले. त्यामुळे लोकांमध्ये भितीचे वातावरण पसरले. अनेकजण इमारती, रेल्वे स्थानकातून बाहेर पडले आणि मोकळ्या जागेकडे धावू लागले.
युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हेने दिलेल्या माहितीनुसार, दुपारी १२.५० दरम्यान भूकंपाचा धक्का जाणवला. भूकंपाचा केंद्रबिंदु मंडाले शहरापासून वायव्येकडे १७.२ किमी अंतरावर होता.