पॅसिफिक महासागरातील टोंगा बेटांवर रविवारी ७.१ तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के बसले आहेत. तसेच या भागात त्सुनामीचा इशारा जारी करण्यात आला आहे, अशी माहिती यूएस जिओलॉजिकल सर्व्हे (USGS)ने दिली आहे.
यूएसजीएसने दिलेल्या माहितीनुसार, टोंगाच्या मुख्य बेटापासून उत्तर पूर्वेला १००० किलोमीटर अंतरावर या भूकंपाचे केंद्र होते. पॅसिफिक त्सुनामी वॉर्निंग सेंटरने इशारा दिला आहे की, भूकंपाच्या केंद्रापासून ३०० किलोमीटर अंतरावरील किनारपट्टीवर धोकादायक लाटांचा परिणाम दिसू शकतो.
“या भूकंपामुळे टोंगाच्या किनारपट्टीवर भूकंपाच्या केंद्रापासून ३०० किलोमीटर पर्यंत धोकादायक त्सुनामी लाटा येण्याची शक्यता आहे,” असे अमेरिकेच्या त्सुनामी वॉर्निंग सिस्टमने म्हटले आहे. दरम्यान या शक्तिशाली भूकंपानंतर झालेल्या नुकसानीची अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. तर जर्मन रिसर्च सेंटर फॉर जिओसायन्सेसने हा भूकंप १० किमी खोलीवर झाला असल्याचे म्हटले आहे.