ब्रिटनमध्ये शिक्षण घेणे परदेशी विद्यार्थ्यांसाठी अवघड होणार आहे. ब्रिटनने त्यांच्या इमिग्रेशन धोरणांत मोठे बदल केले असून 9 एप्रिलपासून हे बदल लागू करण्यात येणार आहेत. याचा सर्वात मोठा परिणाम विद्यार्थी आणि कामगार वर्गावर होणार आहे. यामुळे व्हिसा अर्जाच्या खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. शिवाय, भारतीयांवरही याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. ब्रिटनमध्ये शिक्षणासाठी, नोकरीसाठी जायचे असल्यास जास्त पैसै खर्च करावे लागणार आहेत.
परदेशातील लोकांसह यूकेमधून वर्क व्हिसा किंवा स्टडी व्हिसासाठी अर्ज करणाऱ्यांनाही जास्त पैसे भरावे लागणे आहेत. यामध्ये स्किल्ड वर्कर रुट अंतर्गत अर्ज करणाऱ्यांचाही समावेश आहे. ब्रिटनच्या गृह कार्यालयाने इमिग्रेशन शुल्काची नवीन यादी जाहीर केली आहे. या यादीनुसार, काम, अभ्यास आणि प्रवास अशा वेगवेगळ्या व्हिसा श्रेणींसाठी अर्ज करणाऱ्या परदेशींना जास्त पैसे भरावे लागतील. तसेच ब्रिटनच्या नागरिकत्वासाठीही जास्त शुल्क द्यावे लागणार आहे. यूकेच्या प्रवासी व्हिसाच्या शुल्कात 10 टक्क्यांनी वाढ होणार आहे. येत्या सहा महिन्यांत प्रवासी व्हिसाचे शुल्क पाउंड 127 पर्यंत वाढणार आहे. दोन, पाच आणि दहा वर्षांच्या व्हिजिट व्हिसा देखील महाग होण्याची शक्यता आहे.