वरळीला नव्याने उद्घाटन झालेल्या मेट्रो स्थानकात पाणी साचलं आणि मान्सूनपूर्व तयारीचे दावे फोल ठरले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकांची गैरसोय झाल्याची कबुली दिली आहे. तसंच ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि साताऱ्याला रेड अलर्ट देण्यात आला असल्याची माहिती दिली आहे. एकनाथ शिंदे मंत्रालयातील राज्य आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाला भेट देवून राज्यातील स्थितीचा आढावा घेतला.
“बारामतीत निराचा डावा कालवा फुटला. अजित पवार स्वत: सकाळी ५ वाजल्यापासून तिथे अधिकाऱ्यांसोबत ज्या भागात पाणी शिरलं आहे, तेथील आढावा घेत आहेत. लोकांना मदत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तिथंही जिल्हाधिकारी, अधिकारी आढावा घेत असून, पंचनामा करत आहेत. राज्यात ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि साताऱ्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे. लोकांनाही अत्यावश्यक काम असेलच तरच बाहेर पडावं आणि सुरक्षेची काळजी घ्यावी असं सांगण्यात आलं आहे,” असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे.
मुंबईत पावसामुळे तारांबळ उडाल्यासंबंधी विचारलं असता ते म्हणाले, “मुंबईत उशिरा येणारा पाऊस लवकर आला. २५० ते २७० मिमी पाऊस पडला आहे. गेल्या अनेक वर्षात इतक्या लवकर पाऊस झाला नाही. लोकांची तारांबळ उडाली आहे. लोकांची नक्कीच गैरसोय जाली आहे. पण आता आमची सगळी टीम रस्त्यावर उतरली आहे. सगळे तज्ज्ञ लोक येथे असून, भविष्यातील धोका कसा टाळता येईल यासाठी प्रयत्न करत आहेत”.”पालिकेच्या अधिकाऱ्यांशी बैठक घेऊन त्यांना सूचना दिल्या आहेत. नागरिकांची सुरक्षा आणि एकही जिवितहानी होऊ नये हे आमचं लक्ष्य आहे,” असंही यावेळी त्यांनी सांगितलं.