राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर कार्यक्रमात ‘जय गुजरात’ असा नारा दिल्याने वाट पेटला आहे. एकनाथ शिंदे यांच्यावर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून कडाडून टीका होत आहे. महाराष्ट्राच्या राज्याचे मुख्यमंत्री आणि आता उपमुख्यमंत्री यांना अमित शहांमुळे विसर पडलेला आहे. हे स्वतःला शिवसेनेचे प्रमुख मानतात पण ती शहा शिवसेना आहे. त्यांनी अमित शहांसमोर अशा प्रकारची लाचारी पत्करली आहे अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. यानंतर आता शिवसेनेने उद्धव ठाकरेंचा एक जुना व्हिडीओ पोस्ट करत प्रत्युत्तर दिलं आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह प्रमुख पाहुणे असणाऱ्या कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांनी भाषणाच्या शेवटी ‘जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात’ अशी घोषणा दिली. यामुळे टीका होत असताना आता शिवसेनेने एक्सवर उद्धव ठाकरेंचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यात उद्धव ठाकरे हे ‘जय गुजरात’ म्हणत असल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ पोस्ट करताना सोबत ‘एकतर हे भोंदू आहेत नाही तर संधीसाधू’ अशीही टीका करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे गुजरातमधील भाजपाच्या कार्यक्रमात गेले होते हा व्हिडीओ तेव्हाचा आहे.
मतांसाठी आधी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी गुजरात मतदारांना जवळ करण्याचा आटोकाट प्रयत्न केला होता. त्यासाठी कधी ‘जिलेबी ने फापडा, उद्धव भाई आपडा’, अशा घोषणा दिल्या होत्या. तर आदित्य ठाकरे यांनीही ‘केम छो वरळी’ अशी घोषणा दिली होती. त्यामुळे उद्धव ठाकरे ‘एकतर हे भोंदू आहेत नाही तर संधीसाधू’. अशी घणाघाणी टीका शिवसेनेच्या अधिकृत सोशल मिडीया खात्यावरून करण्यात आली आहे.