गेल्या काही वर्षांत मालिका विश्वात अनेक वेगवेगळे प्रयोग करण्यात येत आहेत. सध्या मालिका विश्वात चर्चा आहे मालिकांच्या महा संगमाची. झी मराठी वाहिनीवर पारू आणि लक्ष्मी निवास या दोन मालिकांचा महासंगम सध्या दाखवण्यात येत आहे. स्टार प्रवाह आणि झी मराठी वाहिनीवर सातत्याने मालिकांचे महासंगम दाखवण्यात येतात.
पारू’मधील आदित्य- अनुष्काचा साखरपुडा आणि ‘लक्ष्मी निवास’ मधील जान्हवी – जयंतचं लग्न असे दोन सोहळे एकाच ठिकाणी एकाच दिवशी होणार असल्यामुळे त्या मालिकांचा महासंगम पाहायला मिळतोय. हा भव्य दिव्य सोहळा नंदमहल पॅलेसमध्ये रंगताना दिसतोय. यासाठी 200 लोकांचं युनिट असून एकाच ठिकाणी जवळपास 60 कलाकार सध्या एकत्र चित्रीकरण करत आहेत. विशेष म्हणजे या एकाच लोकेशनवर 5 वेगवेगळे सेट्स तयार केले आहेत. चुडा भरण्याचा कार्यक्रम, मेहंदी, संगीत, साखरपुडा, लग्न अशा विविध विधी – कार्यक्रमांसाठी सेट्स उभे केले आहेत. कला दिग्दर्शक संदीप इनामके यांनी जादू केली असून भव्य दिव्य असा सेट उभा केला आहे.
हे चित्रिकरण ज्याठिकाणी सुरू आहे ते नंदमहल पॅलेस पुण्यातील खडकवासला येथे आहे. ८० एकर इतक्या जागेत वसलेला हा पॅलेस लक्ष वेधून घेतो.
दोन्ही मालिका सध्या चांगल्या चालू आहेत. दोन्ही मालिकांना प्रेक्षकांचं प्रेम मिळत आहे. त्यामुळे दोन मालिकांचा महासंगम हा प्रेक्षकांसाठी सुद्धा पर्वणी आहे.