झी मराठी वाहिनीवरील लाखात एक आमचा दादा या मालिकेत तुळजा ही मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री दिशा परदेशी हिने नुकतीच मालिका सोडली आहे. दिशाच्या जागी आता अभिनेत्री मृण्मयी गोंधळेकर ही भूमिका साकारणार आहे.
आपल्या बहिणींसाठी आधारस्तंभ असलेला आणि तुळजावर प्रेम करणारा सूर्या दादा सगळ्यांना भावला. या मालिकेत नितीश चव्हाणने सूर्या दादाचं तर दिशा परदेशीने तुळजाचं पात्र साकारलं आहे. प्रेक्षकांना ही जोडी आणि त्यांची केमिस्ट्री खूप आवडली. पण दिशाने आता ही मालिका सोडली आहे. दिशाच्या या निर्णयामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला. दिशाने मालिका सोडल्यानंतर सोशल मीडियावर पहिल्यांदाच पोस्ट केली आहे. तिने मालिका का सोडली, त्याचं कारणही सांगितलं आहे.

दिशाने आपला एक फोटो शेअर करत लिहिलं की,”माय बाप रसिकहो, खूप प्रेम दिलेत तुम्ही… लाखात एक आमचा दादा ही मालिका माझ्यासाठी फक्त एक मालिका नाही तर महाराष्ट्राच्या प्रत्येक घराघरात हसत खेळत बागडण्याची संधीच जणू… आणि काय स्वागत केलंय तुम्ही माझं, स्वतःच्या मुलीसारखं प्रेम केलंत, सुनेसारखे लाड केलेत पण आता झालंय असं की, एका तब्येतीच्या सुरु असलेल्या अडचणीमुळे मला ही मालिका सोडावी लागत आहे. पण तरी एका नव्या भूमिकेत तुमचे मनोरंजन करण्यास पुन्हा सज्ज होईन, अशी खात्री आहे. माझ्यासाठी नक्की प्रार्थना करा.”
तिच्या जागी आता मृण्मयी गोंधळेकर तुळजाचं पात्र साकारणार आहे. मृण्मयी गोंधळेकरने याआधी स्टार प्रवाहच्या ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेत राजमाची भूमिका साकारली आहे. आता नव्या तुळजाला प्रेक्षक स्वीकारतात की नाही, हे पाहावं लागेल. कारण या आधी स्टार प्रवाह वाहिनीवरील प्रेमाची गोष्ट या मालिकेतील मुक्ता म्हणजे अभिनेत्री तेजश्री प्रधानाने मालिका सोडली. त्यानंतर मालिकेचा टीआरपी घसरला होता. आता नवीन तुळजाला प्रेक्षक स्वीकारणार का हे पाहावं लागेल.