जळगावमध्ये शिंदे गटाच्या माजी उपसरपंचाची शुक्रवारी सकाळी किरकोळ कारणावरून तिघांनी धारदार शस्त्राने हत्या केली. नशिराबाद पोलिसांकडून घटनेची नोंद घेण्यात आली असून, पुढील तपासाला गती देण्यात आली आहे.
युवराज सोपान कोळी (३६) हे कानसवाडे येथे शिंदे गटाचे माजी उपसरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य होते. आई-वडील, पत्नी आणि मुलांसह ते वास्तव्यास होते. शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह ते भागवायचे. गुरूवारी रात्री गावातील काही जणांशी त्यांचा किरकोळ कारणावरून वाद झाला. त्याच वादातून शुक्रवारी सकाळी आठच्या सुमारास त्यांच्यावर तिघांकडून धारदार शस्त्रांनी सपासप वार करण्यात आले.
बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरण नुकतेच चर्चेत असताना आता जळगाव येथील माजी सरपंचाच्या हत्येमुळे जळगाव जिल्हाही त्याच वाटेवर आहे का अशी चर्चा स्थानिकांमध्ये सुरू आहे.