मुख्यमंत्र्यांच्या नावे फसव्या योजनेची माहिती समाजमाध्यमांवर व्हायरल

राज्यात मुख्यमंत्री शब्द वापरून चक्क बनावट योजनेची अफवा पसरवल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अनाथ बालकांसाठी ‘मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना’ या नावाने राज्य शासनाची योजना असल्याचे भासवून समाज माध्यमांद्वारे संदेश प्रसारित केले जात आहेत. या अफवेमुळे सर्वसामान्य नागरिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. राज्यात या प्रकारची कुठलीही योजना अस्तित्वात नसून केवळ अफवा पसरवण्यात येत आहे. या योजनेच्या नावावर फसवणुकीला बळी पडू नये, असे महिला व बालविकास विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

केंद्र शासनाच्या अनेक योजना पंतप्रधान, तर राज्यातील योजनांच्या सुरुवातीला मुख्यमंत्री शब्दाचा वापर करून योजनांना नावे दिली जातात. याचा फायदा घेऊन मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना या नावाने खोट्या योजनेची माहिती प्रसारित करण्यात आली आहे. या प्रकारच्या फसव्या संदेशांमध्ये ‘दि. १ मार्च २०२० नंतर दोन्ही पालक अथवा एक पालक मृत्यू झाला आहे व बालकांचे वय १८ वर्षे पेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील दोन मुलांना बाल सेवा योजनेत दरमहा चार हजार मिळणार आहेत व त्याचे अर्ज तहसील कार्यालयात उपलब्ध आहेत. सदर अर्ज भरून जिल्हा बाल संरक्षण कक्ष, जिल्हा परिवीक्षा अधिकारी यांच्याकडे सादर करावे’ असा मजकूर प्रसारित करण्यात येत आहे.

महिला व बाल विकास विभागाकडून मुख्यमंत्री बाल आशिर्वाद योजना अशा नावाने कोणतीही योजना अस्तित्वात नसून हा संदेश केवळ अफवा आहे. त्यामुळे त्यावर विश्वास ठेवून आर्थिक नुकसान होणार नाही याबाबत दक्षता बाळगावी. अशा अफवा असलेल्या समाज माध्यमातील पोस्टवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी गिरीश पुसदकर यांनी केले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here