राज्याच्या राजकारणात मनसे आणि शिवसेना युतीची चर्चा सुरू असतानाच नाशिकमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमधील वाद उफाळून आला. वाद इतका वाढला की ठाकरेंच्या नेत्याने बैठकीतून काढता पाय घेतला.
ठाकरे गटाचे माजी महापौर विनायक पांडे आणि ग्रामीण जिल्हा संपर्क प्रमुख जयंत दिंडे यांच्यात हा वाद झाला. विधानसभा निवडणुकीत वसंत गीते उमेदवार असताना प्रचाराचा मुद्दा जयंत दिंडे यांनी उपस्थित केला. एमडी ड्रग्स विषय लोकांपर्यंत व्यवस्थित न पोहोचल्याने गीते यांचा प्रभाव झाला अस जयंत दिंडे म्हणाले. मात्र यावर विनायक पांडे यांनी आक्षेप घेत तसं असतं तर गीते यांना एवढे मतदान झालं असते का? असा प्रश्न विचारला.
विनायक पांडे आणि जयंत दिंडे यांच्यात जोरदार शाब्दिक बाचाबाची झाली. आम्ही इतके वर्ष पक्षात आहोत ते उगाच का? असं म्हणत विनायक पांडे तडकाफडकी बैठक सोडून निघून गेले. विनायक पांडे यांच्या मागोमाग पांडे समर्थक देखील बैठक सोडून निघून गेले.