लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभाग आणि आदिवासी विकास विभागातून यापूर्वी निधी वर्ग करण्यात आल्यानं वाद निर्माण झाला होता. आता महायुती सरकारमधील मंत्री दत्तात्रय भरणे यांनी लाडकी बहीण योजनेमुळं निधी यायला उशीर होतोय, असं म्हटलं आहे. दुसरे मंत्री छगन भुजबळ यांनी देखील दत्तात्रय भरणे यांनी वक्तव्य केलं त्यात लपवण्यासारखं काय आहे, असं म्हटलं. उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार यांनी दत्तात्रय भरणे यांच्या अपेक्षा काय आहेत, याची माहिती घेणार असल्याचं म्हटलं.
दत्तात्रय भरणे यांनी काल एका कार्यक्रमात बोलताना म्हटलं की, मी इंदापूर तालुक्याल सर्व विभागातून जास्त निधी आणण्याचा प्रयत्न करत असतो. आज लाडक्या बहिणीमुळे निधी यायला थोडा उशीर होतोय. थोडा उशीर झाला पण गाडी हळूहळू पूर्ववत यायला लागली आहे.