राज्यात गुइलेन बॅरे सिंड्रोमच्या (जीबीएस) रुग्णांची संख्या 101 वर पोहोचली असून, त्यातील 16 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. रुग्ण आढळून आलेल्या परिसरात आरोग्य विभागाकडून 25 हजार 578 घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. राज्यातील एकूण रुग्णांपैकी 68 पुरुष आणि 33 महिला आहेत. ‘जीबीएस’च्या रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली असून, पुणे ग्रामीणमध्ये 62 रुग्ण, पुणे महापालिकेच्या हद्दीत 19, तर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत 14 रुग्ण आणि इतर जिल्ह्यातील 6 रुग्ण आहेत. दरम्यान सोलापूरमध्ये एका संशयित रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
आरोग्ययंत्रणा अलर्ट मोडवर!
या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात संपूर्ण तयारी करण्यात आली. या रुग्णालयात जीबीएस रुग्णांवर उपचार करण्याकरिता 45 बेडचा वॉर्ड तयार करण्यात आला आहे. प्रशासनानं खबरदारी घेत पिंपरी चिंचवड येथील रुग्णांना वायसीएम रुग्णालय तर पुणे शहरातील कमला नेहरू रुग्णालय येथे मोफत उपचार सुरू करण्यात येणार आहेत.

काय आहे जीबीएस आजार?
गुइलेन बॅरी सिंड्रोम (GBS) हा एक दुर्मिळ आणि गंभीर स्वयंप्रतिकार विकार आहे. ज्यामध्ये शरीराची रोगप्रतिकारक यंत्रणा चुकून मज्जासंस्थेवर हल्ला करते. या हल्ल्यामुळे सूज येते आणि मज्जातंतूंचे नुकसान होते, ज्यामुळे स्नायू कमकुवत होतात, मुंग्या येणे, सुन्न होणे आणि कधीकधी गंभीर प्रकरणांमध्ये श्वास घेण्यास त्रास होतो. या आजाराचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र फ्लू, डेंग्यू किंवा गॅस्ट्रोइंटेस्टाइनल इन्फेक्शननंतर अनेक प्रकरणांमध्ये GBS आढळून आले आहे.